रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री (RSC) ही एक ना-नफा तत्त्वावर चालविण्यात येणारी आंतरराष्ट्रीय ख्याती असलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना १८४१ मध्ये शास्त्रज्ञ, डॉक्टर, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक यांचा समावेश असलेल्या ७७ व्यक्तींनी लंडन इथे ‘केमिकल सोसायटी ऑफ लंडन’ या नावाने केली. या संस्थेचे पहिले अध्यक्ष डायलिसिस तंत्राचे जनक थॉमस ग्रॅहम हे होते. युके स्थित असलेली ही संस्था भारतासह जगभरातल्या सुमारे १२५ देशांमध्ये विविध शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रकल्प राबवते. या प्रकल्पांमध्ये ‘युसूफ हमीद इन्स्पिरेशनल सायन्स प्रोग्रॅम’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाचाही समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत भारतातील विज्ञान शिक्षकांचे सक्षमीकरण करणे, त्यांच्यात विविध कौशल्यांचे विकसन करणे आणि विद्यार्थ्यांना मुलभूत विज्ञानाकडे वळविण्यास प्रवृत्त करणे या उद्देशाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
या शिक्षक सक्षमीकरण प्रकल्पाचे उद्दिष्ट विज्ञानातील संकल्पना प्रभावीपणे शिकविता येण्यासाठी शिक्षकांना नवीन तंत्रे अवगत करून देणे हा आहे. विद्यार्थ्यांचे विज्ञानविषयक आकलन सुधारण्यासाठी आणि त्यांच्यात विज्ञान शिकण्याविषयीचा उत्साह विकसित करण्यासाठी ही तंत्रे प्रभावी असल्याचे शास्त्रीय अभ्यासातून सिद्ध झाले आहे. ही तंत्रे अत्यंत सहजपणे वर्गात वापरली जाऊ शकतात आणि त्यामुळे विद्यार्थी कृतींमधून विविध वैज्ञानिक संकल्पना शिकू शकतात. त्याचबरोबर पारंपारिक प्रयोगशाळेच्या सुविधा नसल्या तरीदेखील सोप्या पद्धतीने विज्ञानाचे प्रयोग कसे करता येतात, हे शिकण्याची संधी या प्रशिक्षण कार्यक्रमांतून शिक्षकांना मिळते.
हेमंत लागवणकर हे रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीतर्फे ‘युसूफ हमीद इन्स्पिरेशनल सायन्स प्रोग्रॅम’ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात ‘शिक्षक विकासक’ (Teacher Developer) म्हणून काम करत आहेत. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात ऑगस्ट २०२१ ते मे २०२२ या कालावधीत हेमंत लागवणकर यांनी एकूण १८६ कार्यशाळांमधून ८१५ शाळांमधील १२३७ विज्ञान शिक्षकांना ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’तर्फे प्रशिक्षण दिले आहे.
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये जून २०२२ ते मे २०२३ या कालावधीत एकूण १६२ कार्यशाळांमधून १०६४ शाळांतील १५६९ विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये जून २०२३ ते मे २०२४ या कालावधीत एकूण १२६ कार्यशाळांमधून १०३४ शाळांतील १८३१ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळा प्रामुख्याने जम्मू-काश्मीर मधील कटरा, कठुआ, किश्तवाड, अनंतनाग, कुपवाडा येथे तर महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, नंदुरबार, धुळे, नाशिक, सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद, मुंबई, रायगड या जिल्ह्यांत आणि गोव्यात पणजी इथे घेण्यात आल्या.
कोरोना महामारीच्या काळात प्रशिक्षण कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. प्रत्येक कार्यशाळेचा कालावधी सुमारे अडीच ते तीन तास इतका होता. महाराष्ट्र राज्यातील प्रामुख्याने नंदुरबार, धुळे, नाशिक, नांदेड, ठाणे, मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील शिक्षकांनी या प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येक सहभागी शिक्षकाचा कार्यशाळेत सक्रिय सहभाग असावा, यासाठी आर. एस्. सी. च्या सूचनेनुसार प्रत्येक बॅचमध्ये केवळ १५ ते २५ शिक्षकांनाच प्रवेश देण्यात आला.
२३ सप्टेंबर २०२२ पासून ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच प्रत्यक्ष स्वरूपात कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली गेली. प्रत्येक बॅचसाठी दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते आणि एका बॅचमध्ये साधारण ३० ते ४५ शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते.
प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA), मुंबई, महाराष्ट्र शासन यांचा सहभाग :
RAA ची स्थापना महाराष्ट्र राज्य शासनाने ठराविक क्षेत्रातील शैक्षणिक संस्था आणि शाळांसाठी एक मार्गदर्शन केंद्र म्हणून केली आहे. शैक्षणिक क्षेत्रात संशोधन आणि प्रायोगिक कार्य व्हावे यासाठी एक व्यासपीठ म्हणून देखील RAA कार्य करते. शासनाच्या या संस्थेतर्फे शिक्षकांना शिकविण्याच्या नवनवीन पद्धतींबद्दल प्रशिक्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन केले जाते.
हेमंत लागवणकर यांनी RAA, मुंबईच्या सहकार्याने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात विज्ञान शिक्षकांच्या ३२ बॅचेससाठी एकूण ९६ कार्यशाळा घेतल्या आणि मुंबई व उपनगरांतील ४४५ शाळांमधील ६६२ विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षण दिले. या ६६२ विज्ञान शिक्षकांपैकी २८९ शिक्षक हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२२ शाळांतील होते.
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात RAA, मुंबईच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील शाळांमधून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. १४ जुलै २०२२ ते १४ सप्टेंबर २०२२ या कालावधीत घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या एकूण १४ बॅचेसना ४२ कार्यशाळांमधून हेमंत लागवणकर यांनी प्रशिक्षण दिले. या सर्व कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. या कार्यशाळांमधून ठाणे जिल्ह्यातील १८५ शाळांमधील २४३ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल सहभागी शिक्षकांचा अभिप्राय:
शिक्षकांनी या कार्यशाळांच्या माध्यमातून आनंददायी शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि या कार्यशाळा त्यांना विज्ञान शिकविण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त वाटल्या. अशा प्रकारच्या वेगळ्या प्रशिक्षणाचा अनुभव पहिल्यांदाच घेतल्याचे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले. शिक्षकांनी या कार्यशाळांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला आणि यांतील सत्रांमध्ये अनेक कृती प्रत्यक्ष करून पाहिल्या.
प्रत्यक्ष वर्गात आढळलेली परिणामकारकता:
जेव्हा शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत शिकलेल्या साधनांचा आणि तंत्रांचा वापर प्रत्यक्ष वर्ग अध्यापनात सातत्याने करतात तेव्हाच कोणताही शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होतो. प्रशिक्षणात सहभागी झालेले अनेक शिक्षक वैज्ञानिक संकल्पना शिकवताना कार्यशाळेत शिकलेली विविध साधने आणि तंत्रे सातत्याने वापरत असल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थी या कृतीप्रधान शैक्षणिक तंत्रांचा आनंद घेत वैज्ञानिक संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतात, असे चित्र आहे.
नियोजन:
सदर
प्रशिक्षणामध्ये तीन कार्यशाळांचा समावेश आहे. या कार्यशाळा पुढीलप्रमाणे:
• कृतियुक्त शिक्षणाकडे वाटचाल या कार्यशाळेत, शिक्षकांना कृतियुक्त शिक्षणाच्या संकल्पनेची ओळख विविध तंत्रे प्रत्यक्षात वापरून करून दिली जाते.
• विज्ञान शिक्षणामध्ये कृतियुक्त तंत्रांचा विकास या कार्यशाळेत विज्ञानाचे प्रयोग आणि विविध खेळांच्या मदतीने विज्ञान शिक्षण कृतियुक्त कसे करता येते हे दाखविले जाते. त्याचप्रमाणे, व्हिडिओ, व्हर्च्युअल लॅब आणि सिम्युलेशनच्या वापरावर देखील चर्चा केली जाते.
• कृतियुक्त विज्ञान शिक्षणाची पुढील वाटचाल
या कार्यशाळेत विज्ञानातील अमूर्त संकल्पना, त्यांच्याविषयी निर्माण होणाऱ्या गैरसमजूती आणि या गैरसमजूती दूर कशा करता येतील यांवर चर्चा केली जाते.
प्रशिक्षणाची उद्दिष्टे:
‘युसूफ हमीद इन्स्पिरेशनल सायन्स प्रोग्रॅम’ या कार्यक्रमाच्या प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये सहभागी झालेले शिक्षक पुढील बाबतीत सक्षम होतात:
• शिक्षकांना अवगत असलेल्या विविध कृतियुक्त तंत्रांमध्ये वाढ होणे.
• कृतियुक्त पद्धती वापरून धड्याची योजना करणे.
• विज्ञान शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना साहाय्यभूत ठरणाऱ्या ऑनलाइन संसाधनांची ओळख करून घेणे आणि त्यांचा वापर करणे.
• विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या गैरसमजूती ओळखणे आणि दूर करणे. यासाठी विविध नैदानिक चाचण्यांचा वापर करणे.
• विद्यार्थ्यांच्या विज्ञानातील आकलनाचा वेध घेणे.
• विज्ञानातील अमूर्त संकल्पना शिकवण्यासाठी कृतियुक्त तंत्रांचा वापर करणे.
• विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक आकलनाचे मूल्यमापन करण्यासाठी कृतियुक्त तंत्रांचा वापर करणे.